------------------------------------------------
आम्ही सहा भावंड, एक भाऊ, चार बहीणी माझा नंबर पाचवा, अगदी सर्व सामान्य कुटुंब. वडील कडक शिस्तबद्ध, आई मायाळू पण वेळीच शिस्तीचा बडगा उगारनारी, आमचे वडील त्याना आम्ही आबा म्हणत, भयंकर मेहनती तसेच काटकसरी, बावडा शुगर मिल मधे नोकरी करुन घरी आल्यावर सुतार काम करायचे. आम्ही सर्व भावंड शुगर मिल शाळेत शिक्षण घेत होतो.1980 काळात साधारणपणे माझ वय 10 असेल सहाव्या वर्गात असेन, थोरले बंधू इंजिनीअरिंग करत, बाकीचे वयाप्रमाणे शिक्षण चालू होते, मी लहान असल्याने घरातील बारीक सारीक किराणा सामान आणावयाच झालेस मलाच दुकानात धाडलं जायच, त्यात मी नुकताच सायकल शिकलो होतो, ते ही मधनं पाय घालुन, मग माझा दुकानात जायला उत्साह असायचा.
एकदा आईने मला दोन रुपये दिले आणि सामान आणायला गुरवाच्या दुकानात पाठवले. मी सायकल काढली खिशात पैसे कोंबले आणि जोरात गेलो दुकानात, किराणा सामान घेतलं, मग पैसे देण्यास खिशात हात घातला. पण पैसे काय सापडणात सर्व खिसे तपासले, मग जरा जास्तच घाबरलो आणि सावरून गुरव मामांना म्हणालो "पैसे नंतर देतो" गुरव दुकानदार आमचे आबांचे चांगले ओळखीचे असल्याने त्यांनी मला सामान दिले. तसच मी सामान आईकड सुपूर्द केल आणि खेळायच्या नादात पार विसरून गेलो.
काही दिवस गेले मी खेळत असताना घरी बोलावन आलं, घरी आलो वडिल जरा रागात दिसलं, "कायरे उधारी कुठं केलीस " मी कुठं नाही केली" अस म्हणताच एक फटका एवढ्या जोरात बसला की माझी चड्डीच ओली झाली, मग माझ्या ध्यानात आले गुरवाची उधारी. मग मी म्हटलं माझ पैस पडलं म्हणून उधार आणले. मग आणखी फटका, मग माझी बहीण मधे पडली, कशी बशी सुटका झाली. तरी वडील म्हणाले पैसे पडले तर त्या वेळी सांगायच उधारी का केलीस? आई पण म्हणाली "खर बोलला असतास तर हीनी मारलं नसत"
त्या दिवसापासून आज पर्यंत इतके व्यवहार पुर्ण केले, पण मी आजतागायत कधीही उधारीवर काहीहि वस्तू आणत नाही.
कारण आमच्या आबांनी लावलेली आम्हाला शिस्त आजही विसरलो नाही.
कारण, शिस्तीतुनच संस्कारांचा जन्म होतो
[Image 231.jpg]
दिलीप बापुसो सुतार, कसबा बावडा
[Image 232.jpg]
No comments:
Post a Comment